बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सतत नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केली आहे. त्याच्याकडून जप्त झालेल्या मोबाईलमधील सीम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सीआयडी आणि एसआयटीचा या प्रकरणात सखोल तपास सुरु आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयीन समितीदेखील गठीत केली आहे. या सर्व घडामोडींच्या दरम्यान आता सूत्रांकडून मोठी माहिती समोर आली आहे. आकाचं कनेक्शन आता थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण वाल्मिक कराड याच्याकडून जप्त करण्यात आलेलं सीम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराडकडच्या मोबाईल जप्तीनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात याच सीममधून अनेक फोन झाल्याचा एसआयटीला संशय आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.“आका जो आहे तो साधा आका नाही. या आकाकडे 17 मोबाईल होते. तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की, तो अमेरिकेहून धमकी देत होता. तो अमेरिकेचे सीम वापरत असेल. तो ते वापरत असेल. आका काय-काय नाही करू शकत? आकाचा बाका 50-50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता”, असा धक्कादायक दावा सुरेश धस यांनी केला.
अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर आरोप
दरम्यान, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. हत्या आणि खंडणी हा एकच गुन्हा आहे, असंदेखील अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. राजकीय वरदहस्त नसतं तर वाल्मिक कराड इतका मोठा कधी झालाच नसता. धनंजय मुंडेंनी कराडला पदोपदी वाचवलं नसतं तर तो इतका मोठा झालाच नसता. माझं सरळसरळ म्हणणं आहे की, ते दोन वेगळे नाहीत. एकच गुन्हा आहे. खंडणीपासून गुन्ह्याला सुरुवात झाली आणि याच गुन्ह्यातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यांनी विरोध केला नसता तर त्यांची हत्याच झाली नसती. कारण खंडणी मागणं आणि दहशत निर्माण करणं एकच होतं. त्यातूनच ही हत्या झाली.